अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जल-भूमिपूजन
राज्यपाल श्री. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे व उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई, दि. 24 : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नियोजित स्मारकस्थळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजी राजे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पंतप्रधान श्री. मोदी यांनी कलशांचे पूजन केले. त्यानंतर पंतप्रधान श्री. मोदी यांच्यासह मान्यवरांनी नद्यांचे पाणी व गडकिल्ल्यांची पवित्र माती नियोजित स्मारकस्थळी अर्पण केली. श्रीराम विवेक देवधर गुरुजी यांनी भूमिपूजन विधी पार पाडला. स्मारकाच्या नियोजितस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीत बसलेला पुतळा उभारण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कलश सुपुर्द
कार्यक्रमाच्या प्रारंभी गिरगाव चौपाटी येथे झालेल्या कार्यक्रमात समारंभासाठी राज्यभरातून आणण्यात आलेल्या नद्यांचे जल आणि प्रमुख गडकिल्ल्यांच्या पवित्र मातीचे कलश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपुर्द केले.
याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पाटील पोटे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, खासदार रावसाहेब दानवे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार मंगल प्रभात लोढा,आमदार राज पुरोहित, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक, गड किल्ले संवर्धनाचे काम करणारे संभाजीराव भिडे गुरुजी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कलश सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान श्री. मोदी यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विविध मान्यवर हावरक्राफ्टने हे कलश घेऊन अरबी समुद्रातील स्मारकाच्या नियोजित स्थळाकडे रवाना झाले.
या कार्यक्रमानिमित्त गिरगांव चौपाटीवर शिवकालीन आरमाराचे चित्र उभे करण्यात आले होते. याठिकाणी भव्य समारंभदेखील आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला पंतप्रधान श्री. मोदी यांच्यासह मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या उपस्थित जनतेने यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत जल्लोष केला.