मराठी : मनमोहक फ्लेमिंगो पक्ष्यांचं पालघर जिल्ह्यातल्या जलाशयात आगमन

नीता चौरे ,पालघर,22 जुलाई : लालबुंद चोच , लांबसडक मान ,लांबलचक सडपातळ पाय , आणि गुलाबी पंख असं लोभस रूप असलेले परदेशी पाहुण्यांचं अर्थात फ्लेमिंगो पक्ष्यांचं पालघर जिल्ह्यातल्या केळव्याच्या दांडा खटाळी इथल्या जलाशयात आगमन झालं आहे. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी पक्षी प्रेमींचे पाय या जलाशयाकडं वळू लागलेत.
तब्बल दोन ते अडीच महिन्यांच्या काळानंतर हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे फ्लेमिंगो पक्षी पावसाळ्या च्या जुले महिन्यात दांडा खटाळी इथल्या जलाशयाच्या पाणथळ भागात दाखल झालेत. जवळपास चाळीस ते पन्नास इतक्या संख्येत हे परदेशी पाहुणे इथल्या शांत अणि पाणथळ भागात दाखल झाले आहेत . गेल्या दहा ते बारा दिवसांपासून ते इथं दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षी प्रेमीं मध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
ह्या पक्ष्यांच्या पाण्या मधल्या शिस्तबद्ध अशा हालचाली नेत्रसुखद ठरतात . आणि पाण्यात शांतपणे आपलं भक्ष्य पकडण्यासाठी एका रांगेत तेरा – तेरा ते सोळा च्या थव्याचं दृश्य अगदी मन मोहून टाकतं. थवेच्या-थवे असल्यानं जणु पाण्यात त्यांच्या काही कवायतीचं सुरु असल्याचा भास होतो. त्यामुळे त्यांचं हे मनाला मोहन टाकणारं असं दृश्य एकटक पाहतचं रहावसं वाटतं.
मूळ च्या आफ्रिकेच्या असलेल्या या फ्लेमिंगो पक्ष्यांना मराठीत रोहित पक्षी असं म्हटलं जातं. तर या पक्षाचं शास्त्रीय नाव हे फिनिकोप्टेरस असं आहे. आणि मुख्यत्वे त्याला इंग्रजीत फ्लेमिंगो या नावानं ओळखलं जात. हा पाणथळ जागी आणि थव्यानं राहणारा असा पक्षी आहे . उंच मान आणि लांबलचक पाय असलेल्या फ्लेमिंगो या पक्षाचे पंख हे गुलाबी किंवा हलक्या गुलाबी रंगांची असतात . याच्या अशा एकुण सहा प्रजाती असून चार प्रजाती ह्या अमेरिका ख्नादत आणि उर्वरित दोन प्रजाती ह्या जुन्या जगात आढळून येतात. आफ्रिकेमध्ये काही सरोवरां मध्ये मोठ्या संख्येनं या फ्लेमिंगोची वस्ती बघायला मिळते. आणि दरवर्षी हजारों किलोमीटर चा प्रवास करून हे पक्षी भारतातल्या विविध जलाश्यांच्या भागांत स्थलांतर करत असतात .
या पक्ष्याचं मुख्य खाद्यान्न हे पाण्यातले छोटं-छोटे मासे , कीड़े , पाण वनस्पती , शेवाळ आदि आहे. या फ्लेमिंगो पक्ष्याचं एक वैशिष्टय म्हणजे याची लांब चोच. याच्या चोचीमुळे त्याला पाण्यात आपलं खाद्यान्न शोधण सोपं जातं. याच चोचीनं तो चिखलात आपलं घरटं देखील बनवतो .
तर असे हे मनमोहक फ्लेमिंगो पक्षी दाखल झाल्यानं दांडा खटाळी भागाला चांगलचं महत्व आलं आहे. त्यामुळे पक्षी प्रेमींसाठी आणि इथं जवळचं असलेल्या सुप्रसिद्ध केळवे समुद्र किनार्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी या फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.