पालघर येथे स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन…………

पालघर,दि.14 : इंग्रजां विरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांचे पुण्यस्मरण व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे आज हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
आज पालघर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. हुतात्मा चौकाजवळ जिल्ह्यातील काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, (पालघर), सकूर गोविंद मोरे (सालवड), रामचंद्र महादेव चूरी (मुरबे ) यांना 1942 च्या स्वातंत्र्य लढयात याच दिवशी हौतात्म्य् आले होते.
आज या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथील हुतात्मा चौकात जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, पालघरच्या नगराध्यक्ष प्रियंका पाटील, पालघरचे आमदार अमित घोडा,बोईसरचे आमदार. विलास तरे यांच्यासह, विविध पक्षाचे पदाधिकारी प्रतिनिधी, प्रांताधिकारी, तहसिलदार, विविध विभागाचे अधिकारीवर्ग, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विविध शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.