पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

नीता चौरे ,पालघर,4 अगस्त : शनिवार पासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे . अनेक रस्त्यांवर पाणी आल्यानं रस्ते बंद झालेत . तर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पोळ कोलमडून पडल्यानं , बिघाड झाल्यानं आणि मनोर भागात फिडर चे कंडक्टर पाण्याखाली गेल्यानं जिल्ह्यातले अनेक भाग अंधारात आहेत . ज्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत.
रात्रभर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे रविवारी सकाळी वसई , विरार ,नालासोपारा इथं रेल्वे रुळावर आल्यानं काही काळ पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती . मात्र दुपार पर्यंत पाणी असल्यानं रेल्वे सेवा हळूहळू पूर्वत झाली .
शनिवार पासुन पालघर मनोर रस्त्यावर पाणी भरल्यानं हा रस्ता बंद आहे .मनोर बाजारपेठ ते मस्तान नाका इथं पाणी भरल्यानं वाहतूक बंद करण्यात आली असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय . तर करळगाव इथं गोडाऊन मध्ये ४ जण अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम सुरू आहे .नांदगांव इथं बाबू भाई नावाचा व्यक्ती घरात अडकला असून त्याला योग्य ती मदत पोहचवण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर मनोर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या ८ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस आणि ग्रामस्थांना यश आलं आहे .
विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या भाताने ( नवसई ) इथल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या १४ जणांपैकी ४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यां यश आलं असून इतर ६ जणांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे . जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे आणि उपविभागीय अधिकारी यांनी नवसई इथं भेट देऊन पूरग्रस्तांना रेस्क्यू करण्याबाबत सूचना दिल्या. तर फुलपाडा पापडी खिंड डॅम इथं एक व्यक्ती बुडाला असून शोध कार्य सुरू आहे .
वसईच्या मिठागरात ही पाणी भरलं आहे .मलवाडा – वाडा – जव्हार राज्य मार्गावरीलं मलवाडा गावा जवळील पिंजाळ नदीवरील पुलाचा काही भाग हा पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला असल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद आहे . तर मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरल्यानं इथल्या कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय . तांबाडीनदी, साखरापुल,नागझरी बंदारा, विक्रमगचा ओव्हळ ,खांड, मुँहू खुर्द लघु पाटबंधारे र्ओव्हर फ्लो झाल्यानं सर्वच रस्ते बंद आहेत.
वैतरणा , पिंजाळ या नद्यांना पूर आल्यानं नद्यांनी रौद्ररूप धारण केलं आहे . त्यामुळे मलवाडा ,कळभे , सोनाळे खुर्द , ब्रूद्रुक , बोरशेती ,गातेस खुर्द , केलठण , गोराड ,गांधरे ,सापने या गावांत पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे . भातशेती पाण्याखाली गेली आहे . पालघर – वाडा मार्गावरील सापने इथं रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे .
जव्हार-वाडा, विक्रमगड-वाडा, पालघर-विक्रमगड, जव्हार-विक्रमगड, विक्रमगड-डहाणु या मार्गावरील आणि ठिकठिकाणी वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
/
मराठी : मनमोहक फ्लेमिंगो पक्ष्यांचं पालघर जिल्ह्यातल्या जलाशयात आगमन