खबरे

नवीन पालघर जिल्हा मुख्यालय विकसित करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न.

पालघर दि. 29 – सिडको लि. नवी मुंबई मार्फत शासकीय जमीन विकसित करून नवनिर्मित पालघर जिल्हा मुख्यालय तसेच पालघर नव नगर विकसित करण्याबाबत आदिवासी विकास मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थित मंत्रालय येथे बैठक पार पडली.

ठाणे जिल्हयाचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 पासून नवीन पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्हा मुख्यालयाचा सुनियोजित विकास करून विविध विभागांतर्गत येणा-या सर्व जिल्हास्तरीय शासकीय इमारती आणि अधिकारी/कर्मचारी निवासस्थाने बांधणे व त्याठिकाणी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपल्बध करून देणे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार पालघर तालुक्यातील पालघर, कोळगाव, मोरेकुरण, नंडोरे, दापोली, टेंभोडे व शिरगाव या सात गावातील 440 हेक्टर शासकीय जमीन सिडको लि. मार्फत विकसित करण्यात येणार आहे. सदरची जागा कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍्धव्यवसाय व मत्स्य  व्यवसाय विभागाने महसुल विभागाकडे तात्काळ वर्ग करावी. तसेच पालघर नव नगर विकास प्रा‍धिकरणास मान्यता देण्यात आल्याबाबतची अधिसुचना नगरविकास विभागाने निर्गमित करण्याच्या  शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री  विष्णू सवरा  यांनी दिले.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर सनियंत्रण ठेवण्यासाठी पालकमंत्री विष्णू सवरा  यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे पालकमंत्री अध्यक्ष असून जिल्हाधिकारी पालघर हे सदस्य सचिव तर विभागीय आयुक्त कोकण विभाग, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको लि., नवी मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर, पोलीस अधिक्षक, पालघर, सहसंचालक, नगररचना, कोकण  विभाग हे समितीचे सदस्य असणार आहेत.

सदर प्रकल्पाचा प्रस्तावित बांधकाम आराखडा व संकल्प चित्र संबंधित यंत्रणेने लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. या नियोजित जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी 103 हेक्टर जागेवर जिल्हास्तरीय शासकीय कार्यालये, नाटयगृह, विश्रामगृह, कर्मचा-यासांठी निवासस्थाने उभारण्यात येणार असून उर्वरित 337 हेक्टर इतकी जमीन पालघर नव नगर म्हणून विकसित करण्यात येणार असून या  विकसित भुखंडाची विक्री सिडको  लि. विहित कार्यपध्दतीनुसार करणार आहे. या विक्रीद्वारे प्राप्त होणारा निधी  नवीन जिल्हा मुख्यालय व पालघर नव नगर उभारण्यासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.

नवीन जिल्हा मुख्यालयाचा विकास हे एक आदर्श मॉडेल म्हणून नावारूपाला येईल. जिल्हास्तरीय शासकीय कार्यालये एकत्रित आल्यामुळे प्रशासकीय कामालाही गती मिळेल व पालघर जिल्ह्याच्या विकासकामांना चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केला.

या बैठकीस आमदार पास्कल धनारे, आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सिडको लि. भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे सहसचिव अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close