महिलांनी कौशल्यवृध्दीसाठी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी अभिजित बांगर
केशव भूमि नेटवर्क = केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. महिलांनी आपल्या कौशल्यवृध्दीसाठी या योजनेचा लाभ घ्यावा व हक्काच्या रोजगारासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे.
वाळवंडा येथे जिल्हा मुद्रा प्रचार व प्रसिध्दी समिती व डॉन बास्को औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुद्रा बँक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी, उपविभागीय अधिकारी जव्हार श्री सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, जिल्हा कृषी अधिक्षक आर.जी. पाटील, तहसिलदार पल्लवी टेमकर, सहायक संचालक तांबोळी, मुकेश संखे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, महिलांनी आपल्या विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शासनाने विविध येाजना सुरू केल्या असून या योजनांचा महिलांनी लाभ घेतला तर त्या आपल्या कुटूंबाला आर्थिकदृष्टया सक्षम बनवू शकतात. त्यासाठी त्यांच्याकडे फक्त जिदद हवी.महिलांनी याकामी पुढाकार घेतला पाहिजे. शासन मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून आपल्या पाठीशी राहील. आगामी काळात कुटूंबातील सर्व सदस्यांना उपजिविकेची साधन उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना लहान उद्योग सूरु करण्यासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. महिलांनी स्वविकासाबरोबरच आपल्या आजुबाजूच्या गावांमध्ये पाडयांमध्ये ही योजना पोहोचवावी. त्यांना सक्षम करण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासनही जिल्हाधिकारी श्री बांगर यांनी यावेळी दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधर यांनी या महिलांना शुभेच्छा देवून महिलांच्या सक्षमीकरणामुळे कुटूंबाचा पर्यायाने गावाचा विकास होतो याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी मनाशी पक्का निर्धार करून ही योजना गावोगावी पोहोचवावी असे सांगितले. सर्व महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम होवून गाव बदलण्याचा निर्धार करावा असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यास मुद्रा बँक योजना याविषयी अग्रणी बँकेच्या प्रतिनिधी श्रीमती ककाणे यांनी मार्गदर्शन केले या मुद्रा योजनेत लहान व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज देण्यात येते. या योजनेत तीन प्रकार आहेत. 1) शिशु 2) किशोर 3) तरुण. शिशु या मध्ये 50 हजार रुपये पर्यंत कर्ज, किशोरांसाठी 50 हजार ते 5 लाखांपर्यत व तरुण योजनेत 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते. या तीन कर्जावर आकर्षक व्याज दर आकारण्यात येतो. कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. या योजनेत दिलेले हे मुद्राकार्ड मुख्यत: कृषि क्षेत्राच्या व्यतिरिक्त व्यवसाय उद्योग करण्यासाठी देण्यात येत होते. परंतु नुकतेच कृषि क्षेत्राला पुरक असणाऱ्या व्यवसायासाठीही या अंतर्गत कर्ज मिळणार आहे.
छोटे व्यवसाय जसे भाजीपाला विक्री करणारे, स्टेशनरी दुकान, झेरॉक्स मशीन टाकणे, खाणवळ, स्वत:चे ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थ विक्री करणारी गाडी टाकणे, पोल्ट्री फार्म, सेवा देणारा उद्योग अशा प्रकारच्या कुठलाही लघु उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. मुद्रा कार्ड हे डेबिट/क्रेडीट कार्ड सारखे काम करते. आपल्याला मंजूर करण्यात आलेली रक्कम आपल्या आवश्यकतेनुसार मुद्रा कार्डच्या सहाय्याने बँकेच्या ए.टी.एम.मधुन काढू शकतो. मुद्रा योनजेत सर्व राष्ट्रीयकृत बँका,खाजगी बँका, अल्प कर्ज देणाऱ्या पतसंस्था या योजनेत सहभागी आहेत. महिलांनी अधिक माहितीसाठी नजिकच्या बँकेमध्ये भेट द्यावी असे आवाहन केले. प्रकाश वाघ यांनी आभार प्रदर्शन केले.